व्हीडी सतीशन केरळचे नवे मुख्यमंत्री , निकालानंतर १० दिवसांनी काँग्रेसकडून घोषणा

Foto
नवी दिल्ली : काँग्रेस नेते व्ही. डी. सतीशन (वय ६१) हे केरळचे मुख्यमंत्री असतील. निकाल जाहीर झाल्यानंतर १० दिवसांनी, आज (१४ मे) काँग्रेसने ही घोषणा केली. सतीशन हे परवूर मतदारसंघाचे आमदार आहेत. केरळच्या मुख्यमंत्रीपदासाठी के. सी. वेणुगोपाल, रमेश चेन्नीथला आणि व्ही. डी. सतीशन या तीन नावांचा विचार केला जात होता. काँग्रेसच्या हायकमांडने सतीशन यांच्या नावाला मंजुरी दिली. अलाप्पुझा लोकसभा मतदारसंघाचे खासदार के. सी. वेणुगोपाल हे केरळच्या मुख्यमंत्रीपदासाठी राहुल गांधींची पहिली पसंती असल्याचे वृत्त होते. राहुल गांधींनी ११ मे रोजी दिल्लीत वेणुगोपाल यांची खासगी भेटही घेतली होती.

कोट्टायमचे आमदार राधाकृष्णन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, हायकमांडने सर्व संबंधितांचे म्हणणे ऐकून घेतले आणि राहुल गांधी संपूर्ण प्रक्रियेत थेट सहभागी होते. ते म्हणाले की, निवडणुकीसाठी लोकशाही प्रक्रियेचे पालन करण्यात आले. जेव्हा इतके उमेदवार समोर येतात, तेव्हा नेत्याच्या निवडीबाबत गोंधळ निर्माण होणे स्वाभाविक आहे.

केरळमधील १४० पैकी १०२ जागा जिंकल्या
यूडीएफने केरळमधील १०४ पैकी १०२ जागा जिंकल्या, तर काँग्रेसने यापैकी ६३ जागा जिंकल्या. वृत्तानुसार, काँग्रेस आमदारांच्या एका बैठकीत ७५-८० टक्के काँग्रेस आमदारांनी के. सी. वेणुगोपाल यांना पाठिंबा दिला. व्ही. डी. सतीशन यांना केवळ ६ आमदारांचा पाठिंबा मिळाला. मात्र, बैठकीनंतर तीन माजी प्रदेशाध्यक्षांनी सतीशन यांच्या नावाला पाठिंबा दिला. इतकेच नाही, तर यूडीएफचे मित्रपक्ष आययूएमएल आणि केरळम काँग्रेस (जोसेफ) यांनीही सतीशन यांना उघडपणे पाठिंबा दिला. सतीशन यांना वेणुगोपाल यांच्या तुलनेत मोठा जनाधार आहे. ते मावळत्या विधानसभेत विरोधी पक्षनेते सुद्धा होते.